Loudspeaker Controversy: मुंबई पोलिसांनी दिली 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी; नियमांचे करावे लागेल पालन
Loudspeaker | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात सुरु असलेल्या लाऊडस्पीकरबाबतच्या वादाच्या (Loudspeaker Controversy) पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी सांगितले की, त्यांनी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे. त्यांना एकूण 1,144 मशिदींकडून अर्ज आले होते. मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांनी सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिलेली नाही. नियमांचे पालन करून भोंगे वाजवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरविरोधात भूमिका घेतल्यानंतर सध्या हा मु्द्दा संपूर्ण देशात चर्चेत आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींच्यावरील लाऊडस्पीकर काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण केली जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही परवानगीची वाट पाहू नये, असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ठाकरे यांनी मंगळवारी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक घेतली.

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाकरे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण साधले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊ शकतात, असा अहवाल गुप्तचरांना मिळाला आहे, अशी माहितीही महाराष्ट्राच्या गृह विभागाने दिली. राज्यातील 15,000 हून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र डीजीपी यांनी दिली. (हेही वाचा: 'राज ठाकरेंवर कारवाई झाल्यास आंदोलन करू', MNS नेत्यांचा महाराष्ट्र सरकारला इशारा)

डीजीपी रजनीश सेठ यांनी सांगितले की, आज गृहमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. राज्यात SRPF (महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल) आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. कलम 149 CrPC अंतर्गत 13,000 हून अधिक लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.’