
औरंगाबाद पोलिसांनी मंगळवारी मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या विरोधात केलेल्या भाषणाबद्दल गुन्हा दाखल केला. यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली व त्यांच्या पक्षप्रमुखांवर पुढील कारवाई झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जाधव यांनी दावा केला की शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांनीच सर्वप्रथम मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती, परंतु त्यांच्या मुलाने (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) यासाठी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
1 मे रोजीच्या औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी लोकांना मशिदींबाहेर लाऊडस्पीकर न काढल्यास 4 मेपासून हनुमान चालीसा पठण करण्यास सांगितले होते. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी मंगळवारी मनसे प्रमुख आणि रॅलीच्या आयोजकांविरुद्ध 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) सह विविध आयपीसी कलमांखाली गुन्हा दाखल केला.
त्यावर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले, ‘हे लोक (सरकार) आम्हाला रॅलीला परवानगी देताना ज्या प्रकारे त्रास देत होते त्यावरून त्यांना राजसाहेबांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा होता हे निश्चित होते. याच्या पुढची पायरी म्हणजे त्यांची अटक. असे घडल्यास मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, प्रत्येक हिंदूही असेच करेल आणि सरकारला त्याची जागा दाखवेल.’ जाधव पुढे म्हणाले की, आम्ही जे काही करत आहोत त्याचा उद्देश हा फक्त सामाजिक आहे. (हेही वाचा: भाजप राज ठाकरेंचा कठपुतळी म्हणून वापर करत आहे, नाना पटोलेंचे वक्तव्य)
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मेळाव्यासाठी घातलेल्या अटी कडक असल्याने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल याची पक्षाला आधीच कल्पना होती. राज ठाकरे यांच्यावर कारवाई झाल्यास आमच्या कार्यकर्त्यांचा रस्त्यावरचा संघर्ष सरकारला दिसेल. आम्ही खटल्यांना घाबरत नाही. सरकारची ही कृती आम्हाला घाबरवण्यासाठी आहे. आम्ही माघार घेणार नाही, आंदोलन होणारच.’