अहमदनगर: पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळी काळ्या कपड्यांना मज्जाव; नागरिकांवर बनियान, सॉक्स काढण्याची वेळ
Pm Narendra Modi Rally In Ahmednagar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2019: अहमदनगर लोकसभा मतदारसंघ (Ahmednagar Lok Sabha constituency) युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या सभेत एक धक्कादाक प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी सभास्थळी येणाऱ्या नागरिकांना म्हणे काळे कपडे परिधान करुन मैदानात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. या प्रकाराची हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा नागरिकांना त्यांचे काळ्या रंगाचे सॉक्स आणि बनियानही काढायला लावण्यात आली. लोकसत्ता डॉट कॉमने आज तक या वृत्तवाहिनीचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.

अहमदनगर (Ahmednagar) येथील सावेडी उपनगरातील निरंगारी भवन येथे असलेल्या मैदानात ही भव्य सभा पार पडली. मोदींच्या सभेसाठी नेहमीप्रमाणेच चोख बंदोबस्त होता. सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची कसूनच तपासणी करण्यात येत होती. कोणी काळे कपडे तर घातले नाहीत ना याची कटाक्षाने पाहणी करण्यात येत होती. जर कोणी काळे कपडे घातले असतील तर ते त्या नेते व कार्यकर्त्यांना काढून ठेवायला सांगण्यात येत होते. हा प्रकार इतका कटाक्षाने पाळला जात होता की, लोकांना सॉक्स आणि बनियानही काढायाल भाग पाडण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदींच्या सभेत नागरिकांवर अशा विक्षिप्त प्रकाराला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. भोपाळ येथे 2018 मध्ये झालेल्या सभेत आणि अलिकडेच कानपूर येथे झालेल्या सभेतही काळे कपडे परिधान करुन सभेत प्रवेश करणाऱ्या नागरिकांन मज्जाव करण्यात आला होता. (हेही वाचा, Loksabha Elections 2019: अहमदनगर येथील सभेत मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल; पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास)

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून या प्रकाराबाबत वृत्त झळकताच राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि कुतूहल अशा संमिश्र भावाना व्यक्त होत आहेत. मात्र, भाजपकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही.