Lok Sabha Eelection 2024: शिवसेनेकडून ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर
Photo Credit -Facebook

Lok Sabha Eelection 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी ठाणे आणि कल्याण मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ठाण्यातून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) तर कल्याणमधून पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. त्यामुळे ठाण्यातील लोकसभेची जागा (Lok Sabha Eelection 2024)महायुतीत अखेर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी चाल चालत ठाण्याची जागा शिवसेनेकडे खेचून आणली आहे.

नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानंतर म्हस्के यांची लढत आता थेट शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याशी होणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सध्या ते त्या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

कोण आहेत नरेश म्हस्के?

नरेश म्हस्के यांनी शिवसेनेत आत्तापर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता, नगरसेवक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, सभागृहनेता, महापौर अशा पदांवर नरेश म्हस्के यांनी काम केले आहे. त्यांच्यावर ठाणे - कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्व्यकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देणाऱ्या म्हस्के यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी पार पाडताना म्हस्के यांनी शिंदे गटाची भूमिका जोरदारपणे मांडत विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले.

दरम्यान, नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना नाशिक आणि पालघर लोकसभा जागांसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही.