भिवंडी मध्ये स्मशानातून जाणा-या बुलेट ट्रेनबाबत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर
Representational Image | Bullet Train (Photo Credits: PTI)

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु झाली असून त्यासंबंधी सर्व योजनांनाही तितकाच वेग आला आहे. ह्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी अनेक मोक्याच्या जागांवर अतिक्रमण होत आहे. त्यातच अजून एक महत्त्वाची जागा बाधित होण्याची शक्यता आहे ती म्हणजे भिवंडीतील स्मशानभूमी. ह्या स्मशानभूमीला काहीही धक्का लागता कामा नये ह्यासाठी येथील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. तसेच पर्यायी व्यवस्थेबाबत शासनाकडून काहीही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जातोय.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून (NHRC) मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील एकूण ११,७८० चौ. मी. जमीन बुलेट प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७२० चौ. मी. जमीन मसनवटीची आहे. काल्हेर गावातील बाधित होणाऱ्या ३८० चौ. मी. जमिनीपैकी २७० चौ. मी. जमीन स्मशानभूमीची आहे.

खुशखबर! बुलेट ट्रेन साठी नोकर भरती सुरु, जपानमध्ये प्रशिक्षण; NHSRCL ने जारी केली जाहिरात, जाणून घ्या पदे

खारबाव आणि काल्हेरसह लगतच्या गावांतील ग्रामस्थ देखील याच स्मशानभूमीचा वापर करतात. बाधित जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागेबाबत कोणतीही स्पष्टता नाही. विशेष म्हणजे काही गावकरी वगळता अन्य गावकऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि एनएचआरसीएलकडून फसवणूक होत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये वाढीस लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेला प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो. ५०८ किमीच्या बुलेट प्रकल्पाची अपेक्षित किंमत १.१० लाख कोटी असून हा निधी उभारण्यासाठी जपानच्या जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सीकडून ८१ टक्के निधी कर्जाच्या रुपात ०.०१ टक्के या व्याजदराने घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातील १५५ किमीचा मार्ग महाराष्ट्रातून जाणार असून उर्वरीत मार्ग गुजरातमधून जाणार आहे. कर्जाव्यतिरिक्तचा निधी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारतर्फे उभारण्यात येईल.