उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस अध्यक्षांवर 'लेटर बॉम्ब'; पत्र लीक झाल्याने पक्षात खळबळ
Urmila Matondkar | (Photo Credits: Twitter)

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा (Milind  Deora) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षांतर्गत कलहाने पुन्हा एकदा डोके वर काढले. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यातील ट्विटयुद्ध चांगलेच रंगले. त्याची दिल्लीतील नेत्यांनी दखल घेतली. दरम्यान, हा कलह सुरु असतानाच माजी अभिनेत्री आणि काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेले पत्र लिक झाल्याने पक्ष वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी या पत्राचे वर्णन 'लेटर बॉम्ब' असे केले आहे. या पत्रात काँग्रेस नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मातोंडकर यांचा पराभव झाला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या पराभवाचे स्पष्टीकर काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून दिले होते. या पत्रात मातोंडकर यांनी आपल्या पराभवाचे खापर स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर फोडले होते. (हेही वाचा, उर्मिला मातोंडकर राजकारणात कशा आल्या? त्यांनी काँग्रेस पक्षच का स्वीकारला?)

उर्मिला मातोंडकर यांनी लिहिलेल्या पत्रात, स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली फूट, नेतृत्वाचा अभाव, अत्यंत वाईट नियोजन आदी कारणांमुळे आपला पराभव झाल्याचे म्हटले आहे. मातोंडकर यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक प्रचारावेळी काँग्रेस नेत्यांमधील फाटाफूट आणि पडलेले अंतर हे सतत्याने समोर येत होते. स्थानिक पातळीवर काँग्रेसला नेतृत्वच नव्हते. उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांना हे पत्र 16 मे 2019 रोजी लिहिले होते. आपण ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. परंतू, सहकारी नेत्यांकडून मला अपेक्षीत असे सहकार्य मिळाले नाही, असेही उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

एएनआय ट्विट

लोकसभा निवडणूक 2019 ( Lok Sabha Election Results 2019) मध्ये झालेल्या दारुन पराभवानंतर सुरु झालेली काँग्रेस (Congress) पक्षाची पडझड आणि पक्षांतर्गत कलह थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी आपल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये पदाचा राजीनामा देण्याची सुनामीच आल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील नेते आपल्या पदाचा राजीनामा देताना दिसत आहेत.