भाजपचे आमदार आणि पक्षाच्या मुंबई युनिटचे प्रमुख आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एका भामट्याने शेलार यांना बनावट संदेश पाठवला होता. तो खोटा असल्याचे शेलार यांच्या ताबडतोब लक्षात आले आणि त्यांनी याबाबत 29 ऑगस्ट रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आमदार आशिष शेलार यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ सातपुते यांनी त्यांच्या वतीने गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.19 वाजता आमदार आशिष शेलार यांना, ‘'CP-FINVFR, Dear MAHESH ANANT LATURKAT, Close your, Finfriends loan 200216802. Just pay Rs. https://rzp.io/i/igWzL6ce now and get a settlement letter. Ignore if paid 04069243000 Finfriends.’ या आशयाचा संदेश प्राप्त झाला.
लिंक ओपन केल्यानंतर आमदार शेलार यांना आणखी एक मेसेज दिसला. त्यामध्ये नमूद केले होते- ‘कर्ज बंद करण्यासाठी 7,700 रुपये भरा’. आमदार शेलार यांनी कोणतेही कर्ज घेतले नव्हते. त्याचवेळी शेलार यांना 9820120105 आणि 04069243000 या क्रमांकावरून दोन फसवणूकीचे फोन आले आणि त्यांनी कर्जाची रक्कम भरण्याची विनंती केली. हा फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे शेलार यांच्या लक्षात आले आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
प्रचारसभेत व्यस्त असल्याने आमदार शेलार यांच्या सहाय्यकांनी त्यांच्यावतीने खटला दाखल केला. वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, ‘मी कोणतेच कर्ज घेतलेले नाही किंवा कोणाचेही जामीनदार म्हणून काम केलेले नाही. या सर्व फसव्या कारवाया आहेत, ज्याची पोलिसांनी चौकशी करावी. कारवाई व्हावी यासाठी मी गुन्हा दाखल केला आहे. अशा कृत्यांमागे असलेल्यांविरुद्ध कारवाई करून अशा फसव्या कारवायांपासून सामान्य लोकांचे संरक्षण केले पाहिजे.’ (हेही वाचा: Bomb Hoax Call: मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा 34 वर्षीय तरूण अहमदनगरमधून ताब्यात; मुख्यमंत्र्यांशी संंपर्क न झाल्याने दिली धमकी)
अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कायद्याच्या कलम 419 (फसवणूक), 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणा) आणि 511 (गुन्हा करण्याचा प्रयत्न) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67(सी), आणि 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..