Live in Relationship:  प्रेयसीच्या पैंजणानं फोडली पापाला वाचा, प्रियकर गजाआड; नालासोपारा येथील घटना
(file photo)

Live in Relationship: तिच्या डोक्यात दगड घातला. ती मेली. तिचा मृतदेहसुद्धा पेटवला. त्याला वाटलं विषय संपला. पण, विषय तसा संपणारा नव्हता. गुन्हेगार कितीही हुशार असो. तो पुरावा मागे ठेवतोच आणि नियतीही त्याला माफ करत नाही. उशिरा का होईना पण पापाला वाचा फुटते. आता तर पोलीस यंत्रणा हायटेक झाली. तपासाचा वेगही वाढला. मग गुन्हेगारापर्यंत पोहोचायला असा वेळ कितीसा लागणार? काशिमीरा (Kashimira) जंगलात अर्धवट अवस्थेत जळालेला महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला. चेहरा जळाल्यामुळे ओळख पटणे कठीण होतं. पण, पीडितेच्या पैंजणामुळे सर्व उलघडा झाला. पोलिसांनी नालासोपारा रेल्वे स्टेशनवरच (Nallasopara railway station) आरोपीच्या मुसक्या आवळल्या. लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live in  Relation) राहणाऱ्या प्रियकरानेच त्याची प्रेयसी असलेल्या या महिलेची हत्या केली होती. तसेच, मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तो जाळण्याचा देखील प्रयत्न केला होता.

घटनेबाबत माहिती अशी की, निर्मला सचिन यादव (मूळ नाव निर्मला शंकर धोनकर, वय 47 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. नालासोपारा येथील श्रीराम नगर परिसरात त्या किराणा मालाचे दुकान चालवत होत्या. दरम्यान, अबरार मोहम्मद अस्लम शेख (वय 27 वर्षे) नावाचा एक विवाहित व्यक्ती त्यांच्या दुकाणात माल खरेदीसाठी नेहमी येत असे. यातून त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि पुढे हे प्रकरण लिव्ह इन रिलेशन पर्यंत पोहोचले. दोघेही नालासोपारा परिसरातच लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनमध्ये काही दिवस गोडीगुलाबीत गेल्यानंतर निर्मला यादव यांनी अबरार याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. यावर काहीतरी कारणे सांगून अबरारने हा विषय सातत्याने टाळला. दरम्यान, माझ्याशी लग्न कर नाहीतर आपल्या प्रेमसंबंधांची माहिती तुझ्या घरच्यांना सांगेन अशी धमकीच निर्मलाने अबरारला दिली. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे.

निर्मलाची धमकी अबरारच्या वर्मी लागली. आता त्याला तिच्यासोबतच्या लिव्ह इन रिलेशनचा कंटाळा आला होता. त्याने निर्मला आणि तिचा तगादा कायमचा संपवण्याचा विचार केला. त्याने तिच्या हत्येचा कट रचला. दिनांक 15 जानेवारी. निर्मला यादव या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी पुण्याला निघाली होती. पण, रस्त्यात असतानाच तिचा फोन वाजाला. फोन अबरारचा होता. तिने तो स्वीकारला. समोरून अबरार बोलत होता. आपल्याला आपल्या लग्नाची बोलणी करायची आहेत. त्यामुळे तू लवकर भेटायला ये. घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेलजवळ आपण भेटूया असे त्याने तिला सांगितले. निर्मला अर्ध्या वाटेवरुन परत फिरली. तो तीला जंगलात घेऊन गेला. तिथे त्यांचात कडाक्याचे वाद झाला. अबरारने तिच्या डोक्यात दगड घातला. घाव वर्मी लागला. ती जागेवरच ठार झाली. त्यानंतर अबरारने जवळची कपड्यांची बँग आणि त्यातील कपडे तिच्या अंगावर टाकले आणि पेटवून दिले. त्यानंतर तो गुलबर्गा या आपल्या गावी पळून गेला. (हेही वाचा, रात्रीच्या काळोखात बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग)

दरम्यान, पोलिसांना महिलेच्या मृतदेहाबाबत माहिती कळली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. चेहरा जळाल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पण, मृतदेहाजवळ काही कपडे, कागदपत्रे आणि कागद होते. त्यावर काही फोन नंबर लिहिले होते. पोलिसांनी त्या फोन क्रमांकावर संपर्क केला असता त्यातला एक फोन नालासोपारा येथील महिलेचा असल्याचे समजले. पोलिसांनी या मलिलेला एकूण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेने मृत महिलेच्या पायातील पैंजण ओळखले आणि हा मृतदेह निर्मला जाधव यांचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी माहिती काढली तेव्हा, आरोपी अबरार हा सोमवारी नालासोपारा येथे येणार असल्याचे समजले. पोलिसांनी नजर ठेवली आणि नालासोपारा रेल्वे स्थानकातच त्याला अटक केली. प्रेयसीच्या पैंजणानेच तिचा मारेकरी प्रियकर अबरारच्या पापाचा उलघडा केला. काशिमीरा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला.