कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात रेड (Red Zones), ऑरेंज (Orange Zones) आणि ग्रीन झोन (Green Zones) अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) महाराष्ट्रातील (Maharashtra) झोन्सची यादी जाहीर झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून महाराष्ट्रात 14 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. तसेच या जिल्ह्यांमध्ये त्यानुसार केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे नियोजन ठरवण्यात येणार असल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यातसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भारतात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशात आतापर्यंत एकूण 35 हजारांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैंकी 1 हजार 147 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार 889 जण कोरोनामुक्त झाले आहेत
राज्यात रेड झोनमध्ये 14 जिल्हे आहेत. यात मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ यांचा समावेश आहे. ऑरेंज झोनमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार हे जिल्हे आहेत. तर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी कोरोनाचे कमी रुग्ण आढळल्याने या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 498वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 459 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 773 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: हिंगोली येथील नागरिकांची चिंता वाढली; SRPF च्या 25 जवानांना कोरोनाचा संसर्ग
कोरोना विषाणू बाबतची संपूर्ण देशातील स्थिती पाहता सर्वात जास्त जिल्हे रेड झोन मध्ये उत्तर प्रदेशातील असून तब्बल 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरा नंबर महाराष्ट्राचा लागत असून, तिसरा नंबर तामिळनाडूचा आहे. 3 मे रोजी लॉकडाऊन लागू करून 40 दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु, कोरोना विषाणूचे संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे.