Coronavirus: हिंगोली येथील नागरिकांची चिंता वाढली; SRPF च्या 25 जवानांना कोरोनाचा संसर्ग
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूचे जाळे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पसरत चालले आहे. राज्यातील हिंगोली (Hingoli) जिल्हा अवघ्या 10 दहा दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हिंगोलीकरांच्या चिंता वाढवणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. हिंगोलीत एका दिवसात कोरोनाचे तब्बल 26 नवे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 25 जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान (SRPF Jawan) आहेत. यामुळे हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या 24 तासात 21 वरुन थेट 47 पोहचली आहे. यामुळे नागिरकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून 46 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा अहवाल 16 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 एप्रिलला दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. मालेगाव आणि मुंबईतून हिंगोलीत आलेल्या 194 जवानांना क्वारंटाइन करुन ठेवण्यात आले होते. त्यापैकी 95 जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. तर सहा जवानांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एसआरपीएफच्या जवानांना लागण झाल्याने भीती वाढली आहे. हे देखील वाचा- पुण्यात 4 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात COVID-19 बाधित मृतांची एकूण संख्या 99 वर

भारतात कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात थैमान घातला आहे. भारतात आतापर्यंत 35 हजार 043 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैंकी 1 हजार 147 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार 889 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 498वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 459 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 773 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.