Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

कोल्हापूर (Kolhapur) मध्ये शाहूवाडी (Shahuwadi) तालुक्यातील उदगिरीच्या केदारलिंगवाडीच्या हद्दीत आज (21 डिसेंबर) एका बिबट्याने 10 वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मनिषा डोईफोडेचा (Manisha Doifode) मृत्यू झाला आहे. ही आज सकाळी साडे आठच्या सुमारास घडलेली घटना आहे.

शाहूवाडीच्या पुसाळे मध्ये बाबाजी डोईफोडे मागील 4 महिन्यांपासून राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी असा परिवार होता. आज सकाळी बाबाजी डोईफोडे यांची पत्नी आपल्या मुलीसह जनावरांना चरण्यासाठी निघाल्या. केदारलिंग वाडीपासून एक किमी अंतरावर चिमुरड्या मनिषावर बिबट्याने झडप घातली. काही अंतर गेल्यावर मुलीचा आवाज येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजूला पाहिलं असता गवतामध्ये मुलीला ओढून नेणारा बिबट्या त्यांनी पाहिला. आरडाओरडा ऐकून बिबट्याही जंगलात गेला.

दरम्यान मनिषाला बिबट्या घेऊन गेला हे कळताच गावकर्‍यांनीही धावाधाव केली. पण बिबट्याने मानच पकडल्याने मुलीचा जागी मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून परिसरातील वाढती बिबट्यांची दहशत पाहता त्यांचा बंदोबस्त करा अशी गावकर्‍यांची मागणी वाढत आहे. शाहूवाडी जवळ चांदोली अभयारण्य असल्याने तेथे बिबट्यांचा वावर वाढला आहे. हेदेखील नक्की वाचा: तेलंगणातील Sangareddy मध्ये Hetero Pharma Unit मध्ये घुसला बिबट्या; कर्मचार्‍यांची उडाली घाबरगुंडी (Watch Videos) .

मागील काही दिवसांमध्ये शहरी भागातही बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढला आहे. तसेच लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रमाणही वाढले आहे.