महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पोलीस दलातील 4 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू, एकूण COVID19 चा आकडा 2561 वर पोहचला
Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता येत्या 30 जून पर्यत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार आहेत. याच दरम्यान, आता गेल्या 24 तासात पोलीस दलातील आणखी 4 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलातील एकूण 2561 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच आतापर्यंत 31 पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.

राज्यातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तेथे सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरीही वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स आपले कर्तव्य 24 तास बजावताना दिसून येत आहेत.त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे.(Unlock 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील; दुकानं, जीम, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांसदर्भात नवी नियमावली जारी) 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनासंक्रमितांचा आकडा 77793 वर पोहचला असून 2710 जणांचा बळी गेला आहे. तसेच 33681 जणांची प्रकृती सुधारली असून अद्याप 41393 जणांवर उपचार सुरु आहेत. तर आजपासून Unlock 1 नुसार राज्यात लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना सोईसुविधांचा लाभ घेता येणार आहे.  पण त्यावेळी नियमांचे पालन करावे असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.