ससून रूग्णालयातून (Sassoon Hospital) पळून गेलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) साकिनाका पोलिसांनी (Saki Naka Police) तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये पकडून आज मुंबईत आणल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना मीडीया समोर बोलताना एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामध्ये 'ससून हॉस्पिटल मधून आपण पळून गेलो नाही तर पळवण्यात आलं' अशी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान यामध्ये कोणी मदत केली हे देखील लवकरच सांगणार असल्याचंही ललित पाटील म्हणाला आहे. ABP Majha कडून त्याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात ललित पाटील ससून हॉस्पिटल मधून गायब झाल्यानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार ससून मधून बाहेर पडल्यानंतरही ललित अनेक दिवस नाशिक मध्ये होत. मुंबई, पुणे, नाशिक पोलिस मागावर असून देखीलही ललित नाशिक मध्ये कसा होता? असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. त्याला वाचवण्यामागे राजकीय पाठिंबा होता का? याची देखील चर्चा आहे. नाशिक वरून इंदौर, सूरत पुन्हा नाशिक, धुळे, औरंगाबाद असं करत कर्नाटक मध्ये ललित आला. बंगळूरू वरून चैन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
ठाकरे विरूद्ध शिंदे गट
ललित पाटील प्रकरणातही ठाकरे विरूद्ध शिंदे गट एकमेकांसमोर आहे. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासोबतच अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असं त्यांनी म्हटलं आहे. तर दादा भुसे यांनी सुषमा अंधारेंनी ऐकीव माहितीवर सारं म्हटलं आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारेंवर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले आहेत.
ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील ड्रग्स प्रकरणात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. भूषणने मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होता. भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करत होता. त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा आणि ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा अशी माहिती समोर आली आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणाची आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे. दादा भुसे, शंभुराज देसाई, ससूनचे डीन, त्याला पळून जाण्यास मदत करणारे डॉक्टर यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.