विधानसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली तेव्हाच त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. आता त्या चर्चांना अधिक व्यापक स्वरुप येऊ लागले असून, ही योजना खरोखरच बंद होते की काय? असा सवाल उपस्थित होतो आहे. आगोदरच सादर होणारा तुटीचा अर्थसंकल्प, राज्याच्या तिजोरीत असलेला ठणठणाट, वाढता कर्जाचा बोजा आणि त्यातच सुरु झालेली ही योजना आणि प्रतिमहिना त्यात वाढणारे लाभार्थी. हे या या प्रश्नाचे प्रमुख कारण असले तरी, मंत्री पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि या सरकारमधील ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची आलेली प्रतिक्रीया हे या चर्चेस अधिक कारणीभूत ठरते आहे.
'अन्यथा दंड वसूल केला जाईल'
आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना म्हटले आहे की, योजनेचे निकष पाळले गेले पाहिजेत. या योजनेचे लाभार्थी आणि आलेले अर्ज यांची छाननी करुन लाभासाठी अपात्र महिलांना वगळले पाहिजे. या योजनेंतर्गत देण्यात आलेले आतापर्यंतचे पैसे परत मागण्यात अर्थ नाही. ते आपण (सरकार) बहिणींना समर्पित केले असे म्हणून सोडून देऊ. पण, यापुढे निकषात न बसणाऱ्या आणि अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वत:हून आपले नाव योजनेतून काढून घ्यावे. अन्यथा या महिलांकडून दंड वसूल केला जाईल, असे सरकारने सांगावे, असेही भुजबळ म्हणाले. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभार्थींना मिळणार मकर संक्रांत वाण? सातव्या हप्त्याची प्रतिक्षा आणखी किती? घ्या जाणून)
'निकषबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय'
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांन लाभ दिला जाईल. पण आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल. ज्या कोणत्या आर्जाबाबत तक्रार प्राप्त होईल आणि छाननी केल्यानंतर निकबाह्य ठरलेला अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे लाभाचा पुढील हप्ता मिळणार नाही, असे तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अर्जांची छाननी सरसकट होणार नसल्याचेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 25% लाभार्थी वगळणार? सरकार दरमहा वाचवणार 900 कोटी रुपये? घ्या जाणून)
'योजना खंडीत किंवा बंद केल्या जाणार नाहीत'
लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमुळे आम्ही सत्तेत आलो आहोत. आम्हाला सत्तेत पुन्हा येण्यासाठी त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरले. त्याळे या घटकांसाठी सुरु केलेल्या योजना कुठेही खंडीत अथवा बंद केल्या जाणार नाहीत. त्या कायम राहतील, अशी ग्वाहीच मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
दरम्यान, सरकारमधील मंत्र्यांकडून कितीही ग्वाही दिली जात असली तरी, राज्य सरकारने चालवलेली निकषांची भाषा आणि या योजनेबाबत सुरु असलेली चर्चा यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने बंद केली जाऊ शकते, अशी भीती अनेक महिलांच्या मनात राज्य सरकारबद्दल निर्माण झाली आहे. सरकारच्या संभाव्य निर्णयाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम आणि योजना बंद होण्याची भीती दूर व्हायला आणखी काही काळ नक्कीच जावा लागणार आहे.