Ganpati Festival Special Trains 2019: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या एसी डबल डेकरसह तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येतही वाढ
Tutari Express and AC Double Decker Express (Photo Credits: FIle)

गणेशोत्सवासाठी आता जेमतेम 15 दिवस उरले असताना सर्व गणेशभक्त जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच कोकणवासियांसाठी विशेष मानल्या जाणा-या सणासाठी रेल्वेचे बुकिंग देखील हाऊसफुल्ल झाले आहे. अशा वेळी कोकणात जाण्यासाठी आसुसलेल्या चाकरमान्यांची निराशा होऊन नये म्हणून म्हणून गणेशभक्तांच्या सोयीसाठी आता एसी डबल डेकर (AC Double Decker Express) रेल्वे पाठोपाठ तुतारी एक्सप्रेसच्या डब्यातही वाढ केली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेला होणारी गर्दी थोडी आटोक्यात आणता येईल अशी माहिती कोकण रेल्वेने (Konkan Railway)प्रशासनाला दिली आहे.

यात लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर 11 वरुन 18 डब्ब्यांची केली आहे. या डब्ब्यांमध्ये द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे 9 डब्बे, चेअर कारचे 6 डब्बे, जनरेटर कारचे 2 डब्बे अशी रचना असणार आहे. एसी डबल डेकरला 25 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीत हे जादा डबे जोडण्यात येतील. हेही वाचा- Ganpati Festival Special Trains 2019: लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणार 11 डब्ब्यांची विशेष AC डबल डेकर; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना खूषखबर

तर दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (Tutari Express) 15 वरुन 19 डब्ब्यांची करण्यात आली आहे. यात द्वितीय श्रेणी एसीचा एक डब्बा, तृतीय श्रेणीचा एक डब्बा, स्लीपर क्लासचे 7 आणि जनरल क्लासचे 8, सेकंड क्लासचे 2 असे एकूण 19 डब्बे असतील. तुतारी एक्सप्रेसला 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत जादा डब्बे जोडण्यात येणार आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या लोकांची संख्या कमी नाहीय. रेल्वेच्या बुकिंगचा आकडा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या या नवीन योजनेमुळे कोकणात जाणा-या चाकरमान्यांना नक्कीच याचा फायदा होईल. तसेच वेटिंगवर असलेल्या लोकांचा प्रवासही सुखकर होईल असे अंदाज व्यक्त करण्यात येतोय.