Kolhapur Municipal Corporation | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021 (Kolhapur Municipal Corporation Election 2021) पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी वर्ष संपण्याच्या 2 महिने आधी ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेल्याने सर्वांमध्येच नाराजीचा सूर दिसत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मार्चमधील संभाव्य निवडणूक आता नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे यांच्याकडेच पालिकेचा कार्यभार राहणार आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Assembly Budget Session 2021: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 'या' मुद्यांवर होऊ शकते चर्चा

दरम्यान अन्य चार महापालिकांच्या देखील निवडणूका कधी होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. यात कल्याण-डोंबिवली महापालिका, औरंगाबाद महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि वसई-विरार महापालिका यांचा समावेश आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीची तारीख लांबणीवर गेल्याने आता इतर 4 महापालिकेच्या निवडणूकाबाबत सरकार का निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर महापालिकेमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा तिन्ही पक्ष एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.