Kolhapur Bye Election 2022: करूणा शर्मा कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात; 2024 ला धनंजय मुंडेंनाही आव्हान देणार असल्याची घोषणा
Karuna Sharma | | (Photo Credits: Facebook)

काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेवर (Kolhapur Bye Election) पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीत करूणा शर्मा (Karuna Sharma) उतरणार आहे. शिवशक्ती पक्षाची स्थापना झाल्यानंतर आता त्या याच पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण या पोट निवडणूकीसोबतच 2024 ला करूणा शर्मा बीड (Beed) मधून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरूद्ध देखील निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

करूणा शर्मा यांनी निवडणूक बिनविरोध करायची असेल तर कॉंग्रेसने मला पाठिंबा द्यावा असं म्हटलं आहे. दरम्यान चंद्रकांत जाधव यांच्या श्रद्धांजली सभेत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा विचार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलून दाखवला होता. पण भाजपाने आपला उमेदवार सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

करूणा शर्मा कोण?

करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मागील वर्षी मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्याचा स्वीकर देखील केला. धनंजय मुंडेंनी त्यांचे करूणा सोबत कधीपासून संबंध होते याचादेखील खुलासा केला आहे. करुणा शर्मा-धनंजय मुंडे यांना दोन मुलं आहेत. दरम्यान रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली आहे. (हेही वाचा, Dhananjay Munde Allegation Case Update: धनंजय मुंडे यांना दिलासा, तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे; भाजपकडून महिलेच्या चौकशीची मागणी).

निवडणूक आयोगाच्या पोटनिवडणूक वेळापत्रकानुसार, 24 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 28 मार्च आहे. 12 एप्रिलला मतदान आहे तर 16 एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहे.