CM Fadnavis Satara sabha (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांची आज साता-यामध्ये महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभा झाली. उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosle) यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच साता-यात भाजपाची सभा झाली. या सभेत महाराजांनी मागण्या करायच्या नसतात तर आदेश द्यायचा असतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्यांवर भाष्य केले. महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात भरभरून स्वागत झाले त्यासाठी मी सातारकरांचे मनापासून आभार मानतो. उदयनराजे यांनी मला पगडी दिली शिवेंद्रराजे यांनी तलवार दिली. त्यामुळे मी आता छत्रपतींचा मावळा आहे असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवरायांच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने छत्रपतींच्या वंशजांना काय दिले? छत्रपतींचे घराणे घेणारे नाही देणारे आहे. भारतीय जनता पार्टीत उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांचा सन्मान कमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणात महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत दिली.

हेदेखील वाचा- उदयनराजे भोसले यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; आज दिल्लीमध्ये होणार भाजपा पक्षात प्रवेश

संपूर्ण सातारा शहरातून आलेल्या जनादेश रॅलीला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणावर सायंकाळी सव्वासहा वाजता यात्रेचे आगमन झाले. त्यानंतर जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'छत्रपतींचे वंशज आज आमच्यासमवेत आमच्या पक्षात एकाच मंचावर आहेत; यापेक्षा दुसरा सुगीचा दिवस कोणता असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. फाइल पूर्ण असेल तर सातारा शहर राज प्रस्तावावर मी उद्याच सही करतो. गिरिश महाजन यांची तयारी असेल तर याच वर्षी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.' अशी घोषणाही फडणवीसांनी यावेळी केली. हेदेखील वाचा-

उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर NCP आमदार जीतेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; शरद पवारांनी बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं म्हणत टीकास्त्र

छत्रपतींच्या वंशजांच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रवादीला आता महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे, अशी टीका फडणवीस यांनी करत उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

तर दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, राष्ट्रवादीत असताना आमच्या कामाच्या फायली थेट कचऱ्याच्या डब्यात जात होत्या. असे एक नाही अनेकवेळा झाले. कोणतेही काम वेळेत पूर्ण झाले नाही. आघाडी सरकारने अनेक प्रकल्प रखडवून ठेवले. मात्र, हजारो कोटींची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहेत. मला राष्ट्रवादीने काही दिले नसले तरी किमान सहनशीलतेचा एखादा पुरस्कार तरी द्यायला हवा होता,अशीही कोपरखळी राजेंनी लगावली.