Siddaramaiah (PC - Facebook)

कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) सिद्धरमय्या (Siddaramaiah) आज (25 जून) सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली येथे काँग्रेस पक्षाने एक महानिर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी सिद्धरमय्या सांगली दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमास काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, कर्नाटक राज्याची मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिद्धरमय्या प्रथमच सांगलीला येत आहेत. काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील राजमती क्रीडांगणावर काँग्रेसने हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. या मेळाव्याला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

सांगली हा खरेतर काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यात ताकदही मोठी आहे. मात्र, पाठिमागच्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. पाठिमागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहेत. यात आगाडीच्या राजकारणातही काँग्रेसला आपला मतदारसंघ टीकवता आला नाही. परिणामी मागच्या निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात ही जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडे गेली. काँग्रेस उमेदवाराला स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर उमेदवारी करावी लागली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे तगडे नेते राहिलेल्या दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातून येणाऱ्या विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या तिकीटावर उमेदवारी करावी लागली. (हेही वाचा, Sanjay Raut on PM Narendra Modi: पीएम नरेंद्र मोदी विश्वाचे काय भारताचेही नेते नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात)

दरम्यान, आता लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ही जागा काहीही करुन आपल्याकडेच घ्यायची अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यातूनच विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा ही कोणा गट अथवा संघटनेची नाही. ती पक्षाची आहे. काँग्रेसची आहे, अशा आशयाचे विधान विश्वजित कदम यांनी केले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ताकद वाढवली आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याच्या हेतूने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील राजकारण तापले आहे.