Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेवकांची एक बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत बोलताना संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. या वेळी बलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वाचेच नव्हे तर भारताचेही नेते नाही, असा हल्ला चढवला. देशात सध्या दडपशाहीचे वातावरण आहे. दडपशाही करणाऱ्या या मंडळींचे औरंगजेबावर खूपच प्रेम आहे, असेही ते म्हणाले.

एकाच बैठकीत भाजपचा आकडा घसरला- राऊत

बिहारमध्ये काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. पाटणा येथे. या बैठकीत देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. सर्वांकडे आपापला पक्ष होता. त्यांचे चिन्ह होते. झेंडा होता. पण, आपल्याकडे काहीच नव्हते. उद्धव ठाकरे एकटेच होते. त्यांच्याकडे ना पक्ष होता ना चिन्ह. पण असे असले तरी सर्वांनी आदराने चौकशी केली, प्रेम दिले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे स्वत: उद्धव ठाकरे यांना भेटायला, घ्यायला विमानतळावर आले. हे आहे प्रेम. आम्ही केवळ एकत्र आलो तर भाजपच्या 100 जागा कमी झाल्या. आगोदर म्हणत होते 'अब की बार 400 पार' पण आता आम्ही केवळ एकत्र आलो तर अमित शाह म्हणतात विरोधक कितीही एकत्र आले तरीही आमच्या 300 जागा निवडून येतील. (हेही वाचा, Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar: छगन भुजबळ यांच्या मागणीमुळे अजित पवार यांची गोची? विरोधी पक्षनेता विरुद्ध पक्षाध्यक्षपद वाद रंगण्याची चिन्हे)

भाजप देशात नाही-संजय राऊत

आज भाजपवाले सांगत आहेत आम्ही देशात क्रमांक एकचा पक्ष आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत. हे जर हिंदुत्त्वादी पक्ष असतील तर मग कर्नाटकमध्ये पराभव का झाला? कर्नाटकमध्ये हिंदू नाहीत? देशात आज भाजप आहे कुठे? भाजप कर्नाटकमध्ये नाही, तामिळनाडूत नाही, पंजाबमध्ये नाही, राजस्थानमध्ये नाही, तेलंगणात नाही, आंध्र प्रदेशमध्ये नाही, त्यामुळे भाजपने त्या गैरसमजात राहू नये. देशात भाजप नाही, असे संजय राऊत यांनी ठासून सांगितले.