राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांचे नेमके होणार काय? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी नुकतीच संघटनेत काम करण्याची आणि विरोधी पक्षनेता पदावरुन मुक्त करण्याबाबत भूमिका व्यक्त केलीहोती. त्यावर संघटनात्मक निर्णय होईल, असे कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्यानंतर आता पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद जर मराठा समाजाकडे असेल तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी किंवा इतर लहान समाजाकडे द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांच्या या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
छनग भुजबळ यांच्या या मागणीमुळे अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पद मिळावे अशीच मागणी अप्रत्यक्षरित्या केली होती. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, ओबिसी किंवा आणखी लहान समाजाला या पदावर काम करण्याची संधी मिळाली. भाजपचेही पक्षाध्यक्ष पद ओबीसींकडे आहे. मला यापूर्वी प्रदेशाध्यक्ष पद मिळाले असले तरी ते केवळ चार महिन्यांसाठी मिळाले होते. त्यामुळे आताही पक्षात अनेक ओबिसी किंवा इतर समाजाचे नेते चांगले काम करत आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. पक्षाकडे सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते आहेत. मलाही हे पद दिले तरीही मी ती जबाबदारी पार पाडेन असे भुजबळ यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Supriya Sule on Ajit Pawar: 'दादांची इच्छापूर्ती व्हावी', सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया)
आमच्या पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे पक्षाच्या विविध मंचावर मी भूमिका मांडत असतो. मी कधी कधी व्यक्तीगत भूमिकाही मांडत असतो अशी पुस्तीही भुजबळ यांनी जोडली. अजित पवार यांना विचारा त्यांनी म्हटले आहे पक्षात मला काहीही पद द्या. त्यांचे बोलणे शरद पवार ऐकत होते. ते काय तो निर्णय घेतील. माझे त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात बोलणे झाले नाही असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Ajit Pawar: मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा; अजित पवारांची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विनंती)
दरम्यान, अजित पवार यांनी काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि पक्ष संघटनेतील कोणतीही भूमिका त्यांना सोपवावी, असे आवाहन पवार पक्ष नेतृत्वाला केले होते. त्यावर पक्षाच्या वरीष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता होती. सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, त्या म्हणाल्या, अजित दादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा आहे. दादांना संघटनेत संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. दादांनाही संघटनेत काम करायचे आहे याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या इच्छेमुळे संघटना.. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.