Supriya Sule, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची आणि पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक बहिण म्हणून भावाच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. पण हा एक संघटनात्मक निर्णय असेल.

अजित पवार यांनी काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि पक्ष संघटनेतील कोणतीही भूमिका त्यांना सोपवावी, असे आवाहन पवार पक्ष नेतृत्वाला केले होते. त्यावर पक्षाच्या वरीष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता होती. (हेही वाचा, Ajit Pawar: मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा; अजित पवारांची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विनंती)

दरम्यान, सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, त्या म्हणाल्या, अजित दादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा आहे. दादांना संघटनेत संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. दादांनाही संघटनेत काम करायचे आहे याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या इच्छेमुळे संघटना.. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. (हेही वाचा, Ajit Pawar Vs Jayant Patil: अजित पवार स्पष्टच बोलले, मग जयंत पाटील काहीसे चिडले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात नेमके काय घडले?)

अजित पवार यांनी मनातील भावना व्यक्त करत म्हटले होते की, त्यांना सांगण्यात आले आहे की ते विरोधी पक्षनेते म्हणून कठोरपणे वागत नाहीत. अजित पवार यांनी हाच धाका कायम ठेवत जोडले की, मला विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यात कधीच रस नव्हता पण पक्षाच्या आमदारांच्या मागणीनुसार भूमिका स्वीकारली. मला पक्ष संघटनेत कोणतेही पद द्या आणि माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल ती पूर्ण न्याय देईल, असे ते म्हणाले होते.