Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे हिच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल, शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्ट भोवली
Ketaki Chitale, Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणे अभिनत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी केतकी चितळे हिच्याविरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कळवा पोलिसांनी ही तक्रार नोंदवली आहे. दुसऱ्या बाजूला निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

केतीक चितळे हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ज्या प्रकारची पोस्ट शेअर केली आहे ती, अत्यंत आक्षेपार्ह आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या हितचिंतकांचे म्हणने आहे . राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निखील भामरे या व्यक्तीची पोस्ट रिट्वीट करुन ते राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग करुन त्यांच्यावर कारावाई करावी असे म्हटले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या प्रकरणी कळवा पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि गुन्हाही नोंद झाला. (हेही वाचा, Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेला अटक होणार? ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, 'ती' वादग्रस्त पोस्ट भोवण्याची शक्यता)

केतकी चितळे हिने कथीत नितीन भावे या वकिलाची पोस्ट रिपोस्ट करत फेसबुकवर शेअर केली होती. ती पोस्ट खालील प्रमाणे

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

केतकी चितळे हिची फेसबुक पोस्ट आतापर्यंत चार हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केली आहे. तर, जवळपास 367 पेक्षा अधिक युजर्सनी शेअर केली आहे. पोस्टखाली चार हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया या केतकी चितळे हिला विरोध करणाऱ्या आहेत. काहींनी तिला पाठिंबाही दिला आहे. मात्र, तिच्यावर टीका करणाऱ्या पोस्टची संख्या अधिक आहे.