Jalna News: माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञात लोकांकडून दगडफेक, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप
(Pic Credit - Twitter)

शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर आज दुपारच्या सुमारास दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडली होती. यानंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञाताच्या घोळक्याने बबनराव लोणीकर आणि त्यांचे बंधू यांच्या घरावर दगडफेक केली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे परिसरातील पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar on Ajit Pawar: 'तक्रार एकच आहे', शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल सांगितली मनातली गोष्ट)

आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली होती. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडली आहे. यावरून लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद पाहायला मिळत आहे.

राजेश टोपे यांची गाडी फोडल्याच्या घटनेनंतर आक्रमक झालेल्या टोपे समर्थकांनी लोणीकरांच्या घरावर हल्ला केला केल्याचा आरोप होत आहे. यावेळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, याची माहिती मिळताच लोणीकर समर्थक देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच, लोणीकरांच्या घराच्या बाजूला असलेल्या राजेश टोपे यांच्या भावाच्या घरावर लोणीकर समर्थकांनी दगडफेक केली.