Jalna: 6 वर्षांच्या मुलाचा प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने आईनेच केली निर्घृण हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जालना (Jalna) येथून समोर येत आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मातेसह तिच्या प्रियकरासह एका साथीदाराला अटक केली आहे. शीतल उघडे आणि नवनाथ जगधने असे या दोन आरोपींचे नाव आहे. या दोघांमध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध (Extramarital Affair) असून ते जालना मधील अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राहत होते.

प्रेमात अडसर ठरत असल्याने आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली केले. नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने त्या सहा वर्षीय मुलाला अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. (Rajasthan Shocker: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या, पत्नीसह तिच्या 2 प्रियकरांना अटक)

या प्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्हाच्या आरोपाखाली शीतल उघडे हिच्यासह तिचा प्रियकर नवनाथ जगधने आणि एका साथीदाराला अटक केली आहे. यापूर्वी अशाप्रकराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनैतिक संबंधातून पतीची, पोटच्या मुलांची हत्या करण्याच्या बरीच प्रकरणे उघडकीस आली आहेत.

दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या 8 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी येथून समोर आली होती. प्रियकर आईसोबत शारीरिक लगट करत असताना मुलाने पाहिले होते. याबद्दल त्याने वडीलांना सांगितल्याने सूड उगवण्यासाठी आईच्या प्रियकराने गळा आवळून त्याची हत्या केली होती. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते.