अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या 8 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या; भिवंडी येथील घटना
Murder | (Photo Credits: PixaBay)

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या 8 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील कारिवली (करिवली) गावातील ही घटना आहे. 8 वर्षीय मुलगा दुपारपासून बेपत्ता होता. परिसरात शोध घेऊनही न सापडल्याने त्याच्या वडीलांनी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या शोधात खुनाचा प्रकार उघडकीस आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी जितेंद्र मधेशिया अटक करण्यात आली असून त्याने गुन्हाची कबुली दिली आहे. (लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीस लागला पतीच्या अनैतिक संबंधांचा सुगावा; क्रेडीट कार्ड बिल ठरले साक्षीदार)

कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारतीत हे कुटुंब रहातं. मुलाची आई खानावळ चालवते. आरोपी जितेंद्र खानावळीत जेवण करण्यासाठी येत होता. त्यावेळेस त्याचे मुलाच्या आईसोबत संबंध जुळले. एकदा आईसोबत शारीरिक लगट करत असताना मुलाने पाहिले होते. त्याबद्दल त्याने आपल्या वडीलांना सांगितले. त्यानंतर जितेंद्रचे घरी येणे बंद करण्यात आले. याचा राग मनात ठेवून त्याने मुलावर सूड उगावला. (Aurangabad: औरंगाबाद येथील धक्कादायक घटना, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा काढला काटा)

जितेंद्र खेळण्याच्या बहाण्याने मुलाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर घेऊन गेला आणि गळा आवळून त्याची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या 18 तासांत आरोपीला ताब्यात घेतले. भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपीने गुन्हाची कबुली दिली असून त्यास 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र संबंधित महिलेच्या एका चुकीमुळे तिला तिचा पोटचा गोळा आणि संसार गमवावा लागला आहे.