जालना: प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, शिवीगाळ आणि तरुणीचा विनयभंग करून गावगुंड फरार; व्हायरल व्हिडीओमुळे हादरला महाराष्ट्र (Watch Video)
Jalna Couple Beaten By Local Goons (Photo Credits : Twitter)

जालना (Jalna) जिल्ह्यात तरुण प्रेमी युगुलाला गावगुंडांकडून बेदम मारहाण (Beaten), अर्वाच्य शिवीगाळ (Abused) करतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे.गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे. काही गावगुंड या व्हिडिओमध्ये या युगुलाला मारहाण करताना दिसत आहेत, तर यातील मुलीसोबत या तरुणांनी गैरवर्तन केल्याचे देखील म्हंटले जातेय.संबंधित घटनेनंतर कथित युगुलातील मुलगी ही बेपत्ता आहे तर हे गावगुंड देखील फरार आहेत. जालना जिल्ह्यातील गोंदेगाव (Gondegaon) शिवारातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. भंडारा: वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने घेतले मेल्याचे सोंग; पहा व्हायरल व्हिडिओ

या व्हायरल व्हिडिओची दखल स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली आहे. जालना येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून पोलीसांना या घटनेचा तपास करण्याचे तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ समाजमाध्यमांवरुन हटविण्याची कार्यवाही आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या ट्विटर हॅण्डल वरून देण्यात आली आहे.

काय आहे हा व्हायरल व्हिडीओ?

या व्हिडीओ मध्ये गावगुंड तरुण या युगुलाला एका निर्मनुष्य ठिकाणी पाहून मारहाण करायला सुरुवात करताना दिसत आहेत, मारताना त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सुद्धा काढला आहे.या व्हिडिओतील तरुण तरुणी गुंडांना विनंती करत आम्ही फक्त इथे तळं पाहायला आलो होतो असे सांगताना दिसत आहेत. तर तरुण त्यांना निर्दयीपणे मारत तुमच्या आईवडिलांना सांगतो अशी धमकी देत आहेत. या मारहाणीत त्यांनी मुलीचे कपडे धरून तिला फरफटत नेल्याचे देखील समोर आले आहे, यामुळेच यावर तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, जालना पोलिसांनी या गुंडाचा तपास सुरु केला असून त्यासाठी एक खास पथक नेमण्यात आले आहे. या चार जणांपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून अन्य दोघे अद्याप फरार आहेत तर संबंधित मुलीचा तपास देखील लागलेला नाही.