जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक 2020: भाजप उमेदवार रंजना पाटील विजयी, महाविकासआघाडी पराभूत
BJP | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik ) जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्षपद निवडणूक जिंकल्यावर जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपद (Jalgaon Zilla Parishad Presidential Election) निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी महाविकास आघाडीने जंग जंग प्रयत्न केले. मात्र, भारतीय जनता पक्षाने मजबूत तटबंदी उभारल्याने ती भेदण्यास महाविकासआघाडीला यश आले नाही. अर्थात जळगाव जिल्हा परिषद आणि भाजप असे एक समिकरणच गेले अनेक वर्षे पाहायला मिळत आहे. मात्र, भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात सुरु असलेला संघर्ष, आरोप प्रत्यारोप याचा फायदा उठवत प्रथमच महाविकाआघाडीने इथे मोठे आव्हा उभे केले होते. मात्र, हे आव्हान पेलण्यात भाजपला यश आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक निकाल अद्याप जाहीर केला नाही. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार भाजप उमेदवार रंजना पाटील यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.

दरम्यान, या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगावमध्ये गेली 30 वर्षे भाजीपची सत्ता आहे. या आधी शिवसेनेसोबत युती होती. तेव्हाही आम्हाला बहुमत होते. जळगावमध्ये भाजपसमोर कोणाचे आव्हान नाही. जळगाव जिल्हा हा भाजपसोबत आहे. मिळालेले यश हे कोणा व्यक्तीचे नाही हे संपूर्ण पक्षाचे यश असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.