Jalgaon-Surat Coal-Laden Goods Train Derails Near Amalner| X@rajtoday

जळगाव (Jalgaon) वरून सुरतला (Surat) जाणारी मालगाडी आज दुपारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल डिव्हिजन अंतर्गत अमळनेर स्थानकाजवळ (Amalner Railway Station) रुळावरून घसरली. ही घटना दुपारी 2.18 वाजता घडली आहे. ही ट्रेन लूप लाईनवरून सुरतच्या दिशेने मुख्य लाईनवर जात असताना हा प्रकार घडला आहे. दरम्यान या गाडीमध्ये कोळसा होता. लोकोमोटिव्हसह एकूण सात वॅगन रुळावरून घसरल्याची माहिती आहे. ज्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातानंतर काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. तर काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

सुदैवाने, या अपघातामध्ये कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाने केलेल्या पुष्टीनुसार, शक्य तितक्या लवकर सामान्य रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच रुळावरून मालगाडी घसरण्याचे कारण स्पष्ट होणार आहे.

अमळनेर स्थानकावर अपघातामुळे कोणकोणत्या ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल?

रुळावरून गाडी घसरल्यानंतर लगेचच, नंदुरबार, उधना आणि भुसावळ येथून अपघात मदत गाड्या मदत करण्यासाठी रवाना करण्यात आल्या. वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि कामांवर देखरेख करत आहेत.