जैन धर्मीय असल्याचे कारण देत मासे, मटण विक्रीसाठी गाळे बांधण्यास कंत्रटदाराचा नकार; मुंबई महापालिका काय कारवाई करणार?
The BrihanMumbai Municipal Corporation (BMC) (Photo Credits: Facebook)

चेंबुर (Chembur) येथे एका कंत्राटदाराने आपण जैन (Jain) धर्मीय असल्याचे सांगत मासे, मटण विक्रिसाठी उभारण्यात येणारे गाळे बांधण्यास मुंबई महापालिकेला नकार दिला आहे. या विचित्र कारण आणि नकारामुळे मुंबई महापालिका संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत येणाऱ्या चेंबुर येथील मंडईत परवानाधारक विक्रेत्यांसाठी संक्रमण शिबीर बांधण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी महापालिकेने रितसर निविदा मागवल्या. काही कंत्राटदारांनी या निविधा भरल्या. या प्रक्रियेत पात्र झालेल्या कंत्रटदाराला हे काम देण्यात आले. मात्र, पात्र झाल्यानंतर मात्र कंत्राटदाराने पालिकेस गाळे उभारणीस आपल नकार कळवला. या प्रकारामुळे पालिकेने या कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, चेंबुर परिसरात असलेल्या व्ही. एन. पुरव मार्गावर भाऊराव चेंबूरकर मंडई आहे. या मंडीची इमारत जुनी असल्याने ती धोकादायक बनली आहे. त्यामुळे या इमारतीच्या पुनर्बांधणीची आवश्यकता ध्यानात घेऊन महापालिकेने त्यावर काम सुरु केले आहे. मात्र, हे काम करताना मंडईत असलेल्या परवानाधारक गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी याच भूखंडावर संक्रमण शिबीरे उभारण्यात येत आहेत. या शिबीरांमध्ये परवानाधारक विक्रेत्यांची सोय केली जाणार आहे. (हेही वाचा, BEST : मुंबई महापालिका 'बेस्ट'ला देणार 100 कोटी रुपयांचे अनुदान, 6 हजार बसेस भाडेतत्वावर घेण्याचा पर्याय)

दरम्यान, भाऊराव चेंबूरकर मंडई परिसरात संक्रमण शिबीर उभारण्यासाठीचेवास्तुशास्त्रज्ञांकडून प्राप्त झालेले विविध आराखडे पालिकेच्या इमारत विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूरीनंतर या जागेवर स्थापत्य कामे करण्यासाठी बाजार विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या. या प्रक्रियेला प्रतिसाद देत दोन कंत्राटदारांनी निविदा भरल्या. त्यपैकी एका कंत्राटदाराला हे काम मिळाले. या कंत्राटदाराने 8 टक्के कमी दराने हे काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे हा कंत्राटदार पात्र ठरला.

दरम्यान, पालिकेतील संक्रमण शिबीर गाळे बांधकामाच्या कामासाठी पात्र ठरुनही केवळ जैन धर्मिय असल्याचे कारण देत या कंत्राटदाराने हे काम करण्यास नकार दिला. कंत्राटदाराच्या या वर्तनामुळे पालिकेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून, त्याची अनामत रक्कम जप्त केली जाण्याची शक्यता आहे.