महाराष्ट्राच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत दिसून येत आहेत. पण त्यांच्या मुत्सद्दीपणावर अनेकांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकटे तर पडले नाहीत ना असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत तसा आवर्जून उल्लेख केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री मला आज एकटे दिसतायेत. राजकारणामध्ये शक्यतो असं होऊ नये. इतका मोठा पक्ष आहे. मोदींबरोबर अमित शाह तरी आहेत. आज येथे दुर्दैवाने यांच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही. जे आहेत ते अत्यंत शांत बसले आहेत. जे-जे होईल ते पाहत राहावं या भूमिकेतून सगळे पाहत बसले आहेत."
वरिष्ठ पत्रकार संजय जोग यांनी देखील बीबीसी मराठीला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "देवेंद्र फडणवीस हे सतत सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी राहिले. कुठलाही प्रश्न आला की देवेंद्र फडणवीसच सोडवू शकेल अशी पक्षाच्या पातळीवर भूमिका तयार झाल्यामुळे आणि स्वत:ची प्रतिमा तशी तयार केल्यामुळे ते आज एकाकी पडले आहेत."
तसेच निवडणुकीच्या काळात केंद्राकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला गेला होता. परंतु या निवडणुकीच्या निकालात मागील निवडणुकीपेक्षा जागा कमी झाल्याने पक्षाच्या फडणीवसांकडून असलेल्या अपेक्षा भंग तर नाही ना झाल्या अशा चर्चा देखील सध्या राजकीय वर्तुळात रंगात आहेत.