Wedding Dates 2018-2019. (Photo Credits: Pixabay)

Inter-Caste Marriage: रुक्मिणी रणसिंग (Rukmini Ranasing) आणि मंगेश रणसिंग (Mangesh Ranasing). दोघांचे एकमेकांवर भारी प्रेम. त्यातून त्या दोघांनी आंतरजातीय विवाह केला. एकमेकांना आयुष्यभराची साथ द्यायच्या आणाभाका घेत नव्या संसाराची सुरुवात केली. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण, त्या दोघांना काय कल्पना या शुभेच्छा औटघटकेच्याच ठरतील म्हणून. नियतीच्या मनात काही वेगळेच होत. मुलगी रुक्मिणीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांनी त्या दोघाना जिवंत जाळले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारणेर येथील ही घटना. मनाला अस्वस्थ करुन सोडणारी.

काय आहे प्रकरण?

मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे व्यवसायाने गवंडी आहेत. रुक्मिणी रामफल भरतिया (लग्नानंतरचे नाव रुक्मिणी रणसिंग ) यांच्यासोबत त्यांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणी हिच्या माहेरच्या कुटुंबाला आवडला नव्हता. त्यांचा या लग्नाला विरोध होता. दरम्यान, रुक्मिणी आणि मंगेश यांच्यात किरकोळ भांडण झाले. त्या भांडणातून रुक्मिणी ही माहेरी निघोजमधील वाघाचा वाडा येथे गेली.

दरम्यान, रुक्मिणी यांचा पती मंगेश चंद्रकांत रणसिंग हेसुद्धा पत्नीला भेटण्यासाठी वाघाचा वाडा येथे गेले. त्यानंतर रुक्मिणी ही पती मंगेश यांच्यासोबत साजरी जाण्यासाठी निघाली. मात्र, त्याला रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी विरोध केला. तसेच, पती मंगेश याच्यासोबत जाऊ नये यासाठी रुक्मिणी हिच्यावर दबाव टाकला. त्यातून वाद झाला तो वाढत गेला. माहेरच्या मंडळींनी जावई मंगेश रणसिंग यांना आणि मुलगी रुक्मिणी रणसिंग यांना एका खोलीत कोंडून ठेवले. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवून दिले आणि खोलीला बाहेरुन कुलूप लावले. ही घटना 1 मे 2019 रोजी घडली. (हेही वाचा, अहमदनगर: आंतरजातीय मुलासोबत लग्न केल्याने आई-वडिलांनीच केली पोटच्या मुलीची हत्या)

दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी या दोघांना (रुक्मिणी रणसिंग आणि मंगेश रणसिंग) बाहेर काढले. प्राप्त माहितीनुसार, पत्नी रुक्मिणी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, जावयी मंगेश याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी असलेले मुलीचे मामा आणि काका यांना अटक केली आहे. तर, फरार असलेल्या वडीलांचा शोध सुरु केला आहे.