मागील काही दिवसांपासून संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्येच किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांना कोर्टात झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आणि आता ते वक्तव्य त्यांना भोवत आहे. इंडियन बार असोसिएशनने (Indian Bar Association) संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
राऊतांच्या आरोपांनुसार, सध्या राज्यात विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण, दिलासा देण्याचा गंभीर प्रकार सुरु आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातूनही यावर भाष्य करण्यात आले आहे. कोर्टात भाजपाच्या नेत्यांना झुकतं माप दिलं जात पण अनिल देशमुख, नवाब मलिक यांना जामिन मिळत नाही. न्यायव्यवस्था महाविकास आघाडीच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरूनच आता इंडियन बार असोसिएशनच्या वतीने अॅड. अग्रवाल यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल आहे. हे देखील नक्की वाचा: Sanjay Raut On Kirit Somaiya: किरीट सोमय्या अँड फॅमिलीचा विक्रांत नंतर आता 'टॅायलेट घोटाळा' बाहेर काढणार; संजय राऊत यांचा इशारा .
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांना कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्यामध्ये कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राउतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान राऊतांच्या वक्तव्याची रीघ राज्याच्या गृहमंत्र्यांनीही ओढल्याने दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश अवमान याचिकेमध्ये आहे.