Sonu Sood IT Survey: अभिनेता सोनू सूद याच्या घर, कार्यालयात आयकर विभागाकडून 20 तास शोधमोहीम
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

अभिनेत सोनू सूद (Sonu Sood) याच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) बुधवारी (15 सप्टेंबर) रात्री छापे टाकले आहेत. तब्बल 20 तास कसून चौकशी आणि झाडाझडती झाल्यावर गुरुवारी (16 सप्टेंबर) पहाटे आयकर विभागाचे अधिकारी काही फायली घेऊन सोनुच्या घरातून बाहेर पडले. लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदत करणारा गरीबांचा मसिहा अशी ओळख बनलेल्या सोनू सूद याच्या घरावर आयकर विभागाने नेमका छापा का टाकला? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

सोनू सूद याच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजता छापा टाकला. त्याच्या हॉटेलवरही आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती आहे. सकाळी सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत आयकर विभागाचे अधिकारी सोनूच्या घर, कार्यालय आणि हॉटेलवरच होते. ही तपासणी मोहीम तब्बल 20 तास सुरु राहिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याकडून झाडाझडती सुरु असताना सोनू सूद याचे कुटुंबीय आणि त्याचा कर्मचारी वर्गही उपस्थित होता. सोनू सूद याच्या घरातून आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या फाईल्समध्ये नेमके काय होते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (हेही वाचा, Special Olympics World Winter Games 2022 साठी सोनू सूद करणार भारताचे प्रतिनिधित्व)

सोनू सूद याच्या संपत्तीबाबत काही प्रसारमाध्यमांनी एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सोनू सूद याच्याकडे 130 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पाठिमागील 2 दशके सोनू सूद बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करतो आहे. त्याचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. जाहीरात आणि ब्रँडींग हासुद्धा त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख मार्ग आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता सलमान खान याच्या 'दबंग' सिनेमात त्याने साकारलेली भूमिका जोरदार गाजली होती.

सोनू सूद याने लॉकडाऊनमध्ये अडचणीत असलेल्या अनेक नागरिकांची मदत केली. कोरोना व्हायरस महामारी काळात अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरीत कामगार मुंबईत अडकून पडले. या कामगारांना बसने आपल्या मूळ गावी पोहोचविण्याचे मोठे काम सोनूने केले. त्यानंतर सोनू जोरदार चर्चेत आला होता.