
सोनू सूद (Sonu Sood) ने आपल्या वाढदिवसा दिवशी भारताच्या स्पेशल ऑलिम्पिक मुव्हमेंटमध्ये ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून सहभाग घेतला आहे. पुढच्या वर्षी रशियामध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्स (Special Olympics World Winter Games) मध्ये भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी सोनू सूद त्यांच्यासोबत जाणार आहे. स्पेशल ऑलिम्पिक भारतचे अधिकारी आणि काही खेळाडूंसोबत ऑनलाईन चर्चेत सोनू सूदने ही आनंदवार्ता सांगितली. (सोनू सूद याला मिळाली मोठी जबाबदारी, पंजाबमध्ये कोरोना लसीकरण कॅम्पेनच्या ब्रँन्ड अॅम्बेसेटरसाठी निवड)
"आज खूप खास दिवस आहे आणि स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या प्रवासामध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी या परीवाराचा सदस्य म्हणून कार्यरत राहिन आणि या प्लॅटफॉर्मला जास्तीत जास्त मोठा होण्यासाठी मदत करेन," असे सोनू सूद म्हणाला.
सोनू सूदने स्पेशल खेळाडूंसोबत संवाद साधत त्यांच्या काही शंका दूर केल्या आणि ते करत असलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. खेळाडूंनी सोनू सूदला #WalkForInclusion ची ओळख करुन दिली. पुढील वर्षी रशियामधील कझान येथे स्पेशल ऑलिम्पिक्स होणार असून सोनू सूद या टीमचे नेतृत्व करणार आहे. स्पेशल ऑलिम्पिक विंटर गेम्ससाठी या खास टीमसोबत रशियाला जाण्याचा मान मिळणे ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे. मी या खेळाडूंचे प्रोत्साहन तर वाढवेनच. त्यासोबत खेळाडूंकडून उत्तम कामगिरी होईल, याचाही प्रयत्न करेन.
स्पेशल ऑलिम्पिक विंटर गेम्स हे दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते. यामध्ये अंपगत्व असलेल्या व्यक्ती सहभाग घेतात. भारत सरकार आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनकडून बनवण्यात आलेल्या स्पेशल ऑलिम्पिक भारततर्फे या टुर्नामेंटसाठी खेळाडू पाठवण्यात येतात.
सोनू सूदने आमचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. सोनू सूदच्या सहभागामुळे ही मुव्हमेंट एक वेगळा उच्चांक गाठेल, अशी मला आशा आहे, असे स्पेशल ऑलिम्पिक गेम्सच्या चेअरपर्सन डॉ. मलिका नंदा म्हणाल्या.