
नागपूर: भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती (Uma Bharti) यांचा नागपूर (Nagpur) दौरा चांगलाच गाजला. त्यातल्या त्यात सरकत्या जिन्याच्या घटनेची दखल सर्व मिडीयाने घेतली. नागपूर रेल्वे स्टेशनवर बंद एस्केलेटरवरून जाताना अचानक ते सुरु झाले आणि उमा भारती यांचा तोल गेला, त्या पडता पडता वाचल्या. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरील फिरत्या जिन्यांचे नियंत्रण हे फळ विक्रेते आणि पुस्तके विक्रेते यांच्या हातीदेखील असल्याचे निदर्शनास आले आहे. उमा भारती यांच्या या नागपूरभेटी मुळे ही माहिती समोर आली.
तर, दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेसने उमा भारती यांचे नागपूर येथे आगमन झाले. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बॅटरी कार तैनात करण्यात आली होती. परंतु त्यात सामान भरण्यात आल्याने त्यांनी सरकत्या जिन्याने जाण्याचा पर्याय निवडला. त्या जिना उतरत असतानाच अचानक जिना सुरु झाला, त्यामुळे उमा भारती यांचा तोल गेला. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. याबाबत त्यांनी नागपूर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात तक्रारही दाखल केली होती.
(हेही वाचा: आता ट्रेन पकडण्यासाठी धावपळ नको; 'ही' निळी लाईट देणार लोकल सुटत असल्याचा संकेत)
या घटनेनंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. त्यावेळी बाजूला असलेल्या एका बुक स्टॉलवाल्याने ते एस्केलेटर सुरु केले असल्याचे लक्षात आले. मात्र आता रेल्वे स्थानकावरील पुस्तक विक्रते, फळविक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हे जिने आपल्या मनमर्जीप्रमाणे वापरावे म्हणून चक्क बनावट चावी बनवल्याचे निदर्शनास आले आहे. या लोकांच्या मर्जीप्रमाणेच हे जिने काम करत आहेत. आता या लोकांकडे जिन्याची बनावट चावी कशी आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या नागपूर रेल्वे स्थानकावर 4 सरकते जिने बसवले आहे, अजून दोन जिन्यांचे काम चालू आहे. या जिन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमला आहे, मात्र तरी याठिकाणी मनमानी कारभार चालू आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.