महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि मंदिरे पुन्हा सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना पुणेकरांची (Pune) चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पुण्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि शासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
अजित पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "पुणे शहरात करोनाबाधित होण्याचा दर 2.1 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 2.2 टक्के आणि पुणे ग्रामीणमध्ये 3.8 टक्के आहे. गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. तसेच मृत्यूदरात काहीशी घट झाली आहे. दरम्यान, पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होत आहे? याचा सर्वे केल्यानंतर त्यात 0.19 टक्के लोकांना बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण 0.25 टक्के इतके आहे," असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Corona Vaccination Update: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि UIDAI पाठवली नोटीस, कोविन पोर्टलवरील आधार कार्डची आवश्यकता रद्द करण्याची केली मागणी
अजित पवार पुढे म्हणाले की, दुसरा डोस घेतलेले नागरिक कोरोनाचे नियम फारसे पाळत नाहीत. मास्क न घालणे, तसेच इतर नियमावलीचे उल्लंघन करताना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अनेक निर्बंध शिथिल करत असलो तरी, नागरिकांनी मास्क वापरलेच पाहिजेत. तसेच स्वत:सह आपल्या कुटुंबियांची देखील काळजी घेतली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.