IIT Bombay in Powai | Representative Image | (Photo Credits: PTI)

आयआटीतील विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात (IIT-Bombay Darshan Solanki Suicide Case) पोलिसांनी 483 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दर्शन सोळंकी (Darshan Solanki Suicide Case) याच्या आत्महत्येनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलिसांची एक एसआयटी (SIT) नेमून तपास करण्याचे ठरवले. याच एसआयटीने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी अनेकांचे जबाबही नोंदवले आहेत. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात पोलीस भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 506(2) (धमकी) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 च्या विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल केले जाईल, असा अनेकांनी अंदाज वर्तवला होता. दरम्यान, सोलंकीचा वर्गमित्र अरमान खत्री याला विशेष SC/ST न्यायालयासमोर सादर केले जाऊ शकते, असेही या प्रकरणावर बारीक नजर असलेल्या अभ्यासकांनी म्हटले आहे.

ट्विट

दरम्यान, केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या सोलंकीने त्याच्या सेमिस्टरच्या परीक्षा संपल्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी त्याच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. तीन आठवड्यांनंतर, एसआयटीला सोलंकीच्या खोलीतून एक ओळीची चिठ्ठी सापडली ज्यामध्ये लिहिले होते: 'अरमानने मला मारले आहे'. दरम्यान, पोलिसांनी 9 एप्रिल रोजी, SIT ने अरमान खत्रीला IPC अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तसेच SC/ST कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.