Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

बांगलादेशात (Bangladesh) काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये (Tripura Violence) हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात वणवा पेटला आणि अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे हिंसाचार उसळला. रझा अकादमीने महाराष्ट्रात दंगल घडवून आणल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. रझा अकादमी ही महाविकास आघाडीची पिल्लू असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्रिपुरा घटनेचा परिणाम फक्त महाराष्ट्रातच का होत आहे, असा सवाल उपस्थित केला.  यूपीमध्ये का नाही झाले? मध्य प्रदेशात का घडले नाही? हरियाणा, कर्नाटक, बिहारमध्ये का घडले नाही? हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध फक्त महाराष्ट्र आणि त्रिपुरातच का दिसतो?

संजय राऊत म्हणाले, देशभर हिंदू आहेत. सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या पाहिजेत. पण प्रतिक्रिया उमटतात फक्त अमरावती, मराठवाड्यात. रझा अकादमीला कुप्रसिद्ध इतिहास आहे. पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात अशा प्रकारे दंगली घडवून आणण्याची क्षमता त्याच्यात नाही. खरे तर महाराष्ट्राची निवड जाणीवपूर्वक करण्यात आली. त्रिपुरातून इथं दंगल भडकवण्यात आली कारण इथं राज्य सरकार अस्थिर होऊ शकतं. हेही वाचा Tripura: त्रिपुरातील घटनांबाबत सोशल मीडियावरून पसरवल्या खोट्या बातम्या; कोणत्याही मशिदीचे नुकसान झाले नाही, गृह मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

कुठेतरी हिंदूंवर अत्याचार होत असतील तर इतर राज्यातही मोर्चे निघायला हवेत, फक्त महाराष्ट्र आणि त्रिपुरातच का? कारण महाराष्ट्र अस्थिर करून देशात तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागलेले नाहीत. त्यामुळे वातावरण निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत.

संजय राऊत म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात त्रिपुरामध्ये आंदोलने का झाली? दिल्लीत का नाही? बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात प्रथम दिल्लीत निदर्शने व्हायला हवी होती. बांगलादेश सोडा, काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवर अत्याचार होत आहेत. काल मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कर्नलचे कुटुंब शहीद झाले होते. याचा दिल्लीत एकत्र निषेध करूया.

संजय राऊत पुढे म्हणाले की, 'जर या देशात हिंदूंना खरोखरच धोका असेल तर मी म्हणेन की आरएसएसचे सरसंघचालक मोहन राव भागवत साहेबांनी दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व करावे. आम्हीही एकत्र येऊ. पण तसं होणार नाही, त्रिपुरात निदर्शने झाली कारण ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष भाजपसमोर आव्हान निर्माण करत आहे. त्रिपुरात षडयंत्र रचलं जातंय, संपूर्ण देशाचं वातावरण बिघडतंय.