15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास, 16 व्या दिवसापासून टोलबंद आंदोलन - शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले (संग्रहित संपादित प्रतिमा)

सातारा (Satara) महामार्गावर, मुख्यत्वे पुणे-सातारा या दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था प्रचंड वाढली आहे. गेले अनेक वर्षे रस्त्याची विविध कामे चालू आहेत ज्याचा त्रास नागरिकांना होत आहे. या महामार्गावर सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत आम्ही टोल का भरायचा? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या मुद्यावर शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) आक्रमक झाले आहेत. येत्या 15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती झाली नाही, तर 16 व्या दिवसापासून टोलबंद आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवेंद्रराजे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या सोबत, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्सचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आक्रमक झालेल्या शिवेंद्रराजे यांनी महामार्गाची दुरुस्ती, सर्व्हिस रोडची दुरुस्ती होत नसेल तर टोल का भरायचा? असा सवाल उपस्थित केला. शेवटी अधिकाऱयांनी येत्या 15 दिवसात महामार्गाची दुरुस्ती पूर्ण करण्याचा शब्द दिला. त्यानंतर शिवेंद्र राजे यांनी 15 दिवसांत ही दुरुस्ती झाली नाही तर, 16 व्या दिवशी आनेवाडी टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला.

सोबतच जोपर्यंत रस्त्यांची कामे होणार नाहीत तोपर्यंत टोल वसुली पूर्णतः बंद राहील असेही सांगण्यात आले. दरम्यान याआधी 9 नोव्हेंबर रोजी शिवेंद्रराजे यांनी टोलबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्त्यांची दुरुस्ती आणि सोयी सुविधा यांबाबत आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना देण्याची मागणी केली होती. आता अखेर अधिकाऱ्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.