Amit Thackeray (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mahim Vidhan Sabha Result 2024: आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Elections Results) समोर आले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा (Mahayuti) घवघवीत यश मिळालं आहे. भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे. मात्र, मनसेला विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोर जाव लागत आहे. मनसे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly Constituency) मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. माहीम मतदारसंघात रंगलेल्या तिरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांचा विजय झाला आहे.

माहीम विधानसभेतील पराभवानंतर अमित ठाकरे काय म्हणाले?

माहीम विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो.' (हेही वाचा - Maharashtra Assembly Election Results 2024: राज ठाकरेच्या मनसेला जनतेने पुन्हा नाकारले; राज्यात एकही जागी विजय नाही)

मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती एका सामान्य कार्यकर्त्याची होती. जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.  (हेही वाचा  -  Maharashtra Assembly Election Results 2024: आदित्य ठाकरेंनी राखला वरळीचा गड; अमित ठाकरे यांचा पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Thackeray (@amitthackerayspeaks)

आजचा कौल माझ्या प्रवासाची नवी सुरुवात - अमित ठाकरे

आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नसून एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी 24 तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो - तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू, असा विश्वासही अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.