Mumbai Hyatt Regency (Photo Credits: FB)

देशात कोरोना महामारीमुळे आलेल्या लॉकडाऊनचा फटका नोकरदारवर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडल्याने अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे. यात हातावर पोट असणा-यांइतकेच कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान मुंबईत सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल हयात रिजन्सीला (Hyatt Regency) याचा मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे हे हॉटेल पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल व्यवस्थापनाने घेतला आहे. पुरेसा पैसा नसल्याने तसेच या हॉटेलचा सद्य स्थितीत बिझनेस होत नसल्याने येथील कर्मचा-यांचे पगार देऊ शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Hyatt ही अमेरिकन हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. याची मुंबईतील प्रॉपर्टी हयात रिजन्सी ही Asian Hotels च्या अंतर्गत चालविण्यात येत आहे.मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे हॉटेल आहे.हेदेखील वाचा- 'अबकी बार करोडो बेरोजगार', काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल

Hyatt Regency Letter (Photo Credits: Official)

पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद असल्याकारणाने येथे कुठल्याही प्रकारचे बुकिंग स्विकारले जाणार नाही. तसेच गेल्या वर्षीपासून येथे येणा-या ग्राहकांची संख्या रोडावल्याने या हॉटेलचा फारसा व्यवसाय होत नव्हता. परिणामी कर्मचा-यांचे पगार देण्यासाठीही कंपनीकडे पुरेसा पैसा नसल्याने हे हॉटेल तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे असे हॉटेल व्यवस्थापन अधिका-यांनी सांगितले आहे.

हॉटेल एकाएकी बंद झाल्याने येथील काम करणारे कर्मचारी बेरोजगार होणार असल्याने कर्मचा-यांचा गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुसर्‍या लाटेमुळे लाखो लोकांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे आणि यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. दुसरीकडे माहिती मिळत आहे की, या दुसर्‍या लाटेमुळे देशातील जवळपास 1 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सोमवारी ही माहिती दिली. व्यास यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, थिंक टँकच्या अंदाजानुसार मे महिन्यात बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण मेमध्ये 12 टक्के असल्याचा अंदाज आहे, जे एप्रिलमध्ये 8 टक्के होते.