
बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai Taluka) तालुक्यात असलेल्या सातेफळ शिवार येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यत वीट घालून तिची हत्या केली. ही घटना बुधवारी (31 जुलै) पहाटे घडली. दीपाली अशोक नरसिंगे ( वय २२ वर्षे, रा. रायगव्हाण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर, अशोक उर्फ आश्रुबा गुलाब नरसिंगे (वय २६ वर्षे) आरोपी पतीचे नाव आहे. आठवडी बाजाराच्या खर्चासाठी दिलेल्या पैशांचा हिशोब न लागल्याने पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपास करत आरोपीला मुरुड तालुका लातूर येथून एका तासाच्या आत अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, अशोक उर्फ आश्रुबा गुलाब नरसिंगे आणि दीपाली यांचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला आहे. दोघेही मोलमजूरी करुन कुटुंब जीवनचरितार्थ चालवतात. दोघेही वीटभट्टी कामगार आहेत. तसेच, सातेफळ शिवार, वीट भट्टी येथे मजूरी करतात आणि तेथेच राहतात. दरम्यान, अधूनमधून दोघांमध्ये किरकोळ वाद होत असत. मात्र, बुधवारी दोघांमध्ये आठवडी बाजारातील पैशांच्या हिशोबावरुन वाद झाला. बाजारासाठी दिलेल्या पैशांतीर 300 रुपयांचा हिशोब न लागल्याने पती अशोक नरसिंगे चिडला आणि त्याने पत्नीच्या डोक्यात वीट घातली. या घटनेत पत्नी दीपाली जागीच ठार झाली. पैशाच्या हिशोब कारणावरून ही घटना घडल्याच्या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. (हेही वाचा, ठाणे: डान्सबारमध्ये काम करणाऱ्या पत्नीची हत्या, पिंप ठरला साक्षीदार; गुन्हेगार पतीला बेड्या)
घडल्या प्रकाराची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना बुधवारी सकाळी समजली. प्राप्त माहितीवरुन पोलीस घटनास्थळी हजेरी लावली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच, आरोपीला अटकही केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वीटभट्टी मजूरांमध्ये खळबळ उडाली. महिला आणि लहान मुले घाबरुन गेले. तर, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मृत दीपाली हिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.