धक्कादायक! बायको कामावरून उशिरा घरी येते म्हणून पतीने गळा चिरून केली हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पुण्यातील पिंपळे गुरव येथे घरोघरी धुणी-भांडी करणाऱ्या महिलेचा तिच्या पतीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली आहे. शैला हनुमंत लोखंडे, (वय 40) असं मृत महिलेचे नाव आहे. तसेच हनुमंत बाबुराव लोखंडे, (वय 58) असं मृत शैला यांच्या पतीचं नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी हनुमंत लोखंडे यांना अटक केली आहे.

शैला या पुण्यात घरोघरी लोकांची धुणी-भांडी करण्याचं काम करीत असतं. त्यांना कामावरून येण्यास नेहमी उशीर होत असे. त्यामुळे शैला आणि हनुमंत यांच्यात नेहमी भांडण होत असे. दरम्यान, सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास शैला आणि हनुमंत यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. त्यावेळी रागात असलेल्या हनुमंत यांनी शैला यांच्यावर कोयत्याने वार केले. (हेही वाचा - नाशिक: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; बदनामीची धमकी देत मोबाइलमध्ये केले चित्रिकरण)

शैला आणि हनुमंत यांच्या भांडणाचा आवाज ऐकून वरच्या मजल्यावर राहणारा शैला यांचा सावत्र मुलगा खाली आला. त्याने घराची खिडकी फोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी त्याला शैला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर शैला यांच्या मुलाने पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली, असं पुण्यातील सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आपल्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अटक केली. या प्रकरणाची अधिक चौकशी सांगवी पोलिस करत आहेत.