हावडा- कुर्ला (Howrah- Kurla) ज्ञानेश्वरी एक्सप्रेस (Dnyaneshwari Express)च्या पार्सल बोगीत अवैधपणे पशु पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंबून नेत असताना त्यातील शंभरावर प्राण्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती देणारा एक व्हिडीओ सध्या फेसबुक वरून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हावडा वरून सुटणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मध्ये कोलकाता येथे रेल्वेच्या पार्सल बोगीत पिंजरे चढवल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनेका गांधी (Maneka Gandhi) यांच्या मंत्रालयाला कळवण्यात आली आहे. हे पशु पक्षी मुंबईत विक्रीसाठी नेत असल्याची बाब ट्रेनमधील एका पक्षीप्रेमीच्या लक्षात आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत लव बर्ड, कबूतर, पांढरे उंदीर, ससा व अन्य पशुंचे नऊ पिंजरे होते. त्यात सुमारे हजार पशू व पक्षी होते. या बद्दल माहिती मिळाल्यावर गाडी नागपुरात येताच रेल्वे पोलीस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्व पिंजरे उतरवले. त्यातील सुमारे 100 पशुपक्ष्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
शुब्रतो दास या सतर्क प्रवाशाने फेसबूकवर टाकलेल्या या व्हिडिओची दखल घेत नागपुरातील मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यर यांनी रेल्वे पोलीस आणि आरपीएफकडे मदत मागितली. यांनतर लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 5.20 च्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्सप्रेस नागपुरात दाखल होताच पार्सल व्हॅनमधून पशुपक्ष्यांचे नऊ पिंजरे उतरवण्यात आले. यावेळी एकूण हजार पशूंपैकी सुमारे 100 प्राणी हे मृत असल्याचे आढळले.
या प्रकारासंदर्भात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.