Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेनंतर आता वॉशिंग्टन पोस्टकडूनही धारावी पॅटर्नचे कौतूक
Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीची (Dharavi) सध्या जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. धारावीतील परिस्थिती चिंताजनक होत असताना मुंबई महानगर पालिकेने (BMC) कौतूकास्पद कामगिरी करत कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे जगभरातून धारावी पॅटर्नचे कौतूक केले जात आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका ट्विटच्या माध्यमातून धारावीत कोरोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक उपाययोजनांचे कौतुक केले होते. त्यानंतर आता जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वृतपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने (The Washington Post) धारावी पॅटर्नवर आधारित एक लेख प्रसिद्ध केला आहे. ज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे.

महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मुंबई शहरात आढळून आले आहे. यामुळे मुंबईतील एक अत्यंत दाटीचा परिसर असलेल्या धारावीत कोरोनाचा धोका अधिक वेगाने वाढण्याची शक्यता होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने अत्यंत नियोजनबद्ध काम केले आहे. लोकसहभागाचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यावर भर दिला आहे. ज्यामुळे धारावी परिसर नियंत्रणात आला आहे. याचपार्श्वभूमीवर वॉशिंग्टन पोस्टने शुक्रवारी 31 जुलै रोजी धारावी पॅटर्नवर आधारित एक लेख प्रसिद्ध केला आहे. ज्यात म्हटले आहे की, "धारावीमधील कोरोनाविरोधातील लढा घनदाट वस्ती असणाऱ्या अनेक शेजारी तसेच खास करुन विकसित देशांसाठी महत्त्वाचा धडा आहे. डोक्यावर कोरोना संकट असताना धारावीने केलेले उपाय, समुदायाचा सहभाग आणि चिकाटी ही दखलपात्र आहे", असे या लेखात नमूद करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,059 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,15,346 वर

राज्य सरकारने मुंबईमधील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या खांद्यावर सोपवली होती. धारावीतील कोरोना परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. ज्यामुळे इक्बाल सिंह यांनी सर्वकर्मचाऱ्यांची पाठ थोपटली होती. धारावीमधील 85 टक्के रुग्ण बरे झाले असून सध्या 72 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.