समलैंगिकता हा एक आजार (Homosexuality Disease) आहे. त्यावर उपचार केल्यास अनेक रुग्ण बरे होता. मी स्वत: अनेकांना उपचार करुन बरे केले आहे, असा अजब दावा अकोला येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर (Psychiatrist Dr. Deepak Kelkar) यांनी केला आहे. डॉ. दीपक केळकर यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या दाव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मानसोपचारतज्ज्ञांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. केळकर यांच्या दाव्यामुळे एलजीबीटीक्यू (LGBTQ) समूहात नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
डॉ दीपक केळकर हे मुंबई द इंडियन सायकियाट्रिक सोसायटी (IPS) या संस्थेचे सदस्य आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही संस्था देशभरातील सुमारे 8000 मानसोपचार तज्ज्ञांची एकछत्री संस्था आहे. एका YouTube चॅनलवर बोलताना डॉ. दीपक केळकर यांनी दावा केला आहे की, मलैंगिकता हा एक आजार आहे आणि तो कोणालाही होऊ शकतो. औषधे आणि काही थेरेपी घेऊन तो बरा होऊ शकतो. मी अनेकांना बरे केले आहे, असा दावा डॉ. केळकर यांनी केला आहे. डॉ. केळकर यांनी ज्या युट्युब चॅनलवर बोलताना दावा केला जातो त्याचे 1.17 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Crime: मुंबईत समलिंगी व्यक्तीचा छळ करणार्या व्यक्तीची हत्या, दोघांना अटक)
एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक कवी यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, आयपीएसच्या एलजीबीटीक्यू टास्क फोर्सने सातत्याने या समुदायातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि समानतेची वागणूक देण्यासाठी प्रयत्न आजवर अनेकदा केले आहेत. मात्र, आयपीएस ज्या ध्येयाने काम करते त्या ध्येयाच्या विरोधातच भूमीका आयपीएसच्याच एका आजीवन सदस्य असलेल्या व्यक्तीन व्यक्त केली आहे. त्यामुळे आयपीएसच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची भावना अशोक कवी यांनी व्यक्त केली आहे.