राज्यात आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील काही सेवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. लॉकडाऊन 3 च्या काळावधीत राज्यात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली होती. परंतु, लॉकडाऊन 4 मध्ये काही अटींमध्ये शिथीलता देण्यात आली. यात ऑनलाईन दारू विक्रीस परवानगी (Home Delivery) देण्यात आली. या परवानगीनंतर राज्यात कोट्यावधी रुपयांच्या दारूविक्रीची नोंद झाली.

आज राज्यात दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा पुरवण्यात आली आहे. राज्यात सध्या 5975 मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 6067 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 2702 आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत 16 कोटी 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - मुंबईत कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात दारुची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. तसेच या झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु, लोकांनी दारूसाठी सोशल डिस्टसिंगचे पालन केले नाही. त्यामुळे राज्यात कंन्टेंटमेंट झोन वगळून ऑनलाईन दारू विक्रीस परवानगी देण्यात आली. दरम्यान, आज मुंबईत कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात दारुची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.