मुंबईत कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात दारुची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दारुच्या दुकांनांबाहेरील मद्यपींची प्रचंड गर्दी पाहता तो निर्णय मागे घेण्यात आला होता. तर आता मुंबईत कंन्टेंटमेंट झोन वगळून अन्य क्षेत्रात दारुची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी असे म्हटले आहे की, कंन्टेंटमेंट झोन सोडून अन्य ठिकाणी सीलबंद दारुची विक्री परमिट असणाऱ्या नागरिकांना करण्यात येण्यास परवानगी आहे. मात्र दारुची घरपोच डिलिव्हरी करण्याचा उपाय त्यांनी सुचवला असून दुकानातून नागरिकांना दारु खरेदी करण्यास परवानगी नाही आहे. तसेच ई-कॉमर्स कंपन्यांना दारु विक्री करण्याचा परवाना असलेल्या दुकांनामधून नागरिकापर्यंत होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारुची घरपोच डिलिव्हरी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे.(लॉकडाउनमुळे मुंबईतील मद्यपींची गैरसोय होत असल्याने वसई-विरार-पालघर ठरतायत सध्या दारु मिळण्याचे हॉटस्पॉट)

दरम्यान, उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 5864 मद्यविक्री दुकाने सुरू. दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 5984 गुन्ह्यांची नोंद, 2664 आरोपींना अटक तर 16 कोटी 16लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.