संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात प्रवेश केल्यानंतर आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. तसंच कोरोना संबंधित जनजागृती करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी परवानाधारक होर्डिंग मालकांना 16 ते 25 मार्च दरम्यान केवळ कोरोना व्हायरस संबंधित जनजागृती करणारे होर्डिंग्स लावण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर बीएमसी कठोर कारवाई करेल, असेही सांगण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी एकूण 1200 होर्डिंग्ज लागतात.
कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्याची सध्याची गरज आहे. त्यामुळे होर्डिंग मालकांना पत्र पाठण्याचे काम सुरु आहे. तसंच लेखी स्वरुपात पत्र मिळाल्याने त्यांच्याकडे कोरोना व्हायरससंदर्भात जागरुकता निर्माण करणारे होर्डिंग्स न लावण्याचे कोणत्याही कारण असणार नाही. तसंच आठवडाभरापूर्वी ही माहिती जाहिरातदारांना देण्यात आली असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. (मुंबई महापालिका कोरोना व्हायरस आतापर्यंतचे सर्व अपडेट्स; पाहा COVID 19 चा तपशील)
तसंच ज्यांना पुढाकार घेऊन कोरोना जागरुकता संदेश होर्डिंग्स लावण्याची इच्छा आहे. त्यांना या कालावधीत लायसन्स शुल्कावर सूट देण्यात येईल. होर्डिंग मालकांनी नियम न पाळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील आणि लावलेले इतर होर्डिंग्स काढून टाकण्यात येतील, असे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एकूण 110 कोरोनाग्रस्त रुग्ण असून त्यापैकी 17 परदेशी रुग्ण आहेत. तर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 33 इतकी आहे.